शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे जनतेच्या भविष्यासाठी नाही तर त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र आले, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा येथील प्रचारसभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील एकत्र आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं आम्ही ३० वर्षांनंतर पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी एकत्र आलो आहोत. मात्र, ती पुढची पिढी तुम्ही नसून ते त्यांच्या मुलांसाठी म्हणजे शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी, सुशील कुमार शिंदे हे प्रणिती शिंदे यांच्यासाठी तर विजय सिंह मोहिते धैर्यशील मोहिते पाटलाच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा – मुंबईतील आणखी एक जागा शिंदेंच्या पारड्यात, अमोल कीर्तिकरांना ‘या’ कट्टर शिवसैनिकाचं आव्हान!
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढामध्ये केलेल्या विकास प्रकल्पांचा पाढाही वाचला. रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी फ्लड इरिगेशन प्रकल्पासाठी मोठे प्रयत्न केले. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, आम्ही अनेक बैठका घेऊन दुष्काळी भागाला पाणी कसे पुरवता येईल, यासाठी प्रयत्न केले. त्याचा एक भाग म्हणून आम्ही पुराचे वाहून जाणारे पाणी कॅनलद्वारे उजणी धरणापर्यंत नेले. त्यासाठी मोदींच्या माध्यमातून जागतिक बॅंकेकडून निधी आणला आणि दुष्काळी भागात पाणी पोहोचण्याच काम आम्ही केलं, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात फिरतोय, कारण..”, संजय राऊत यांचं नरेंद्र मोदींच्य…
पुढे बोलताना त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्यानंतर माढामध्ये पाणी आणले, रेल्वे आणली अशी विविध विकासकामे त्यांनी केली. त्यामुळे या निवडणुकीत ते पुन्हा खासदार म्हणून निवडणून येतील असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.