काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून, भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाकडून नाशिक आणि नागपुरात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाना पटोलेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
“नाना पटोले बडबडे आहेत. नाना पटोलेंचं काय अस्तित्व आहे, ते बडबडे व्यक्ती आहेत. त्यांना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची नाही. बौद्धिक उंची असती तर त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं असतं. केवळ शारीरिक उंची असणाऱ्या व्यकीला थोडीच उत्तर दिलं जातं.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसेच, “काँग्रेस पक्ष कुठे चालला आहे? एकेकाळी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी ओळखले जाणारे, आता केवळ सत्तेसाठी इतके रसातळाला गेले आहेत? काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे.
याचबरोबर “पंतप्रधान मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं विधान करतात.” असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.
“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे. ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबतीत नव्हते असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.