राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्यात सरकार नावाचं अस्तित्वच दिसत नाही. हे तीनचाकी सरकार बेईमानीने तयार झालेलं आहे आणि बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला, असा आरोप देखील फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे स्थानिक निवडणुकीच्या प्रचारभेत ते बोलताना महाविकासआघाडी सरकारवर जाहीरपणे केला.
या प्रसंगी फडणवीस म्हणाले की, “ महाराष्ट्रातील अवस्था पाहून आता माध्यमं देखील म्हणायला लागली आहे की, महाराष्ट्रातील सरकार आहे कुठे? या सरकारचं अस्तित्वच आता दिसत नाही, अशाप्रकारची अवस्था आहे. तीनचाकी सरकार तिघाडी सरकार हे बेईमानीने तयार झालं, पण बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, तशी या सरकारची अवस्था आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मूळावर उठलेलं सरकार, अशी यांची अवस्था आहे.”
तसेच, “महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री, सत्ता पक्षांचे आमदार आहेत. पण महाराष्ट्रात सरकार नावाचं अस्तित्व शासन नावाचं अस्तित्व दिसत नाही. सरकार म्हणजे शासन म्हणजे काय असतं? गरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी, महिला, युवक या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, यांचा आक्रोश थांबवण्यासाठी जे कृती करतात त्याला सरकार किंवा शासन म्हटलं जातं. मात्र आता जे सरकारमध्ये आहेत त्यांना जनतेशी घेणंदेणं नाही. ते केवळ माल कमवत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत. एक प्रकारे माफियाराज अशाप्रकारची अवस्था आज महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.” असं यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.
याचबरोबर, “महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे, विदर्भात त्याही पेक्षा खराब परिस्थिती आहे. या सरकारच्या गणतीत विदर्भ नाहीच, भंडारा जिल्हा कुठे येतो हे देखील या सरकारला माहिती नाही. भंडारा जिल्ह्यात एकदाच मुख्यमंत्री आले होते, ते का आले? तर आमची बालकं त्यांच्या राज्यात रूग्णालयात मरण पावली म्हणून मुख्यमंत्री आले. पण मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर एक वर्ष झालं तरी त्या रूग्णालयात कुठलीच यंत्रणा बसली नाही. उद्या पुन्हा आग लागली तर तीच परिस्थिती त्या शासकीय रूग्णालयात असेल. अशी अवस्था आहे आणि मागील दोन वर्षात मुख्यमंत्री केवळ दोनदा विदर्भात आले, ही विदर्भाची अवस्था आहे. तसेच, विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला आणि विदर्भाला अक्षरशा नागडं करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.” असा आरोप देखील फडणवीस यांनी महाविकासआघआडी सरकारवर केला.