मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत भाजपा आणि शिंदे गटाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला कारण्यासाठी गुंडाला सुपारी दिली असा आरोप केलेला आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोरीला तसेच पक्षफुटीला भाजपा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा दावाही राऊत यांच्याकडून केला जातो. यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२३ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राऊत यांनी बोलताना काळजी घेणे गरजेचे

“संजय राऊत यांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. मात्र अलिकडच्या काळात संजय राऊत जे बोलत आहेत, ते फार गांभीर्याने घेण्यासारखे नाही,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. तेसच दुर्दैवाने ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे राऊत यांनी बोलताना काळजी घेणे गरजेचे आहे,” असा सल्लाही त्यांनी राऊतांना दिला.

संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर काय आरोप?

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला सुपारी दिली होती, असे राऊत म्हणाले आहेत. या सर्व घटनेचा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ‘ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे,’ असे संजय राऊत यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticizes sanjay raut on shiv sena crisis and allegations on shrikant shinde prd