पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. “आम्ही केंद्रीय उत्पादन शुल्क पेट्रोलवर प्रति लीटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये आणि डिझेल ७ रुपये प्रति लीटरने कमी होईल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी या निर्णयानंतर ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
“पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ८ रुपये आणि ६ रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अनेकानेक आभार! यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्ष १ लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी ६१०० कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे. आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो,” असेही फडणवीस म्हणाले.