नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणार असून, त्यामुळे विद्यापीठांचे वाटोळे होणार आहे, असा हल्ला चढवत विरोधी पक्षांनी विद्यापीठ विधेयकाला विरोध केला असतानाच सत्ताधारी आघाडीने हे विधेयक मंजूर करुन घेतले आहे. विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी व शेवटच्या क्षणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक विचारार्थ सादर केले. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हे विधेयक मंजूर करुन घेतले आहे. विद्यापीठ विधेयकाचा जो काळा कायदा पास केला तो भयानक आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपवण्याचा प्रकार चालू आहे. पण विद्यापीठ विधेयकाचा जो काळा कायदा पास केला तो यापेक्षा भयानक आहे. अर्ध्या रात्री बेकायदेशीर पणे चर्चा थांबवून हे विधेयक सरकारने पास केले. या विधेयकामुळे ही विद्यापीठे राजकारणाचा अड्डा बनवणार आहेत. विद्यापीठांमध्ये घोटाळेच पाहायला मिळणार आहेत. विद्यापीठांना पैसे आणि पायाभूत सुविधा देण्याचे काम सरकारचे आहे. त्यांच्या रोजच्या कारभारामध्ये पडण्याचा अधिकार सरकारला नाही. शिवसेनेसोबत आपले वाद असतील पण तरीदेखील मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांबद्दल काही कणव असेल. युवानेते असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भले व्हावे अशी त्यांच्या मनात इच्छा असेल. पण ज्या प्रकारे त्यांनी कायदा मंजूर करुन घेतला त्यातून मी निराश झालो. सत्ता पक्षामध्ये विद्यार्थ्याचे कोणी हित पाहिल असा नेता उरलेला नाही असे माझे आता ठाम मत आहे. त्यामुळे आता संघर्षाला पर्याय नाही,” असे फडणवीस म्हणाले.

“ …तर आपल्याला काळ देखील माफ करणार नाही”; राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवरुन देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“तुमच्या गाऊन घालण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी उप कुलपतींचे पद तयार करुन आमच्या तरुणांना वेठीस धरण्याचे कारण काय आहे. विद्यापीठांचे सगळ्या प्रकारचे शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकार मंत्र्यांनी घेतले आहेत. राज्यातील विद्यापीठे आता सरकारी महामंडळे झाली आहेत. विद्यापिठाच्या निविदा या तिथे ठरवण्यात आल्या तरी त्याचा निर्णय आता मंत्री घेणार आहेत आणि त्यामध्ये ते काय करणार आहेत हे सांगण्याची गरज नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“नितीन गडकरी मोठे नेते पण…”; शिवसेना भाजपा एकत्र येण्याच्या सत्तार यांच्या वक्तव्यावर देवेंद फडणवीसांची प्रतिक्रिया

“सगळ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होत आहे. त्यामुळे मला भीती आहे की सगळ्या परीक्षा घेण्याचे कंत्राट हे कंपन्यांना देतील. त्यानंतर न्यासासारख्या कंपन्या आल्यानंतर विद्यापिठे ही डिग्री वाटण्याचा अड्डा हे तयार करणार आहेत. परीक्षांचे घोटाळे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विद्यापीठांच्या सीनेटमध्ये जाऊन बसण्याचा वेळ आता मंत्र्यांकडे आहे. कुलगुरूंना बाबू बनवण्याचे काम या कायद्याने केले आहे. त्याच्यापलीकडे कुलगुरुंकडे आता कोणतेही अधिकार नसणार आहेत. कुलगुरुंचे सगळे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticizes the government over the new university law abn