काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या रायपूर येथील अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य केले. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही काँग्रेससोबत सत्तेत होते. तेव्हा तुमची मजबुरी होती. मात्र आताही तुम्ही शांत का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. ते आज (२६ फेब्रुवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >> “अजूनही माझ्याकडे घर नाही,” राहुल गांधींचे विधान; भावूक होत म्हणाले, “५२ वर्षांपासून…”
“मला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एक गोष्ट विचारायची आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. मागच्या काळात उद्धव ठाकरे यांची मजबुरी होती. त्यांना सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करायचे तरी उद्धव ठाकरे मूग गिळून बसायचे. मात्र आता तुमची काय मजबुरी आहे?” असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा आम्ही निषेध करतो, असेही फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले?
“बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजे कमकुवत असणाऱ्यांशीच तुम्ही लढणार का? याला भ्याडपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आम्हाला सत्याग्रही म्हणता, पण तुम्ही सत्ताग्राही आहात,” असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपावर केला.
हेही वाचा >> ‘ठाकरे-शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात,’ असदुद्दीन ओवैसींचे मोठे विधान; म्हणाले, “ही तर राम-श्यामची….”
चार आठवडे चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन
दरम्यान, यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिना चालणार आहे. या अधिवेशनात ८ मार्च रोजी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येईल. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच विरोधकांनी लोकायुक्तसारखा कायदा मंजूर करण्यासाठी मदत करावी. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.