Devendra Fadnavis on Congress : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याकरता काँग्रेस नेते राहुल गांधी काल (२४ डिसेंबर) महाराष्ट्रात आले होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यानेच त्यांची हत्या केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावरून महायुतीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं. आता त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राज्यसभेत अमित शाहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला होता. तसंच, अनेक काँग्रेस खासदारांनी संसद परिसरात आंदोलनही छेडलं होतं. त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याप्रकरण उजेडात आलं. त्यामुळे काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात आक्रमक भूमिका घेतली. यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी संसदेचा वेळ खराब केला, आता जनतेचा वेळ खराब करत आहेत. संसदेत बोलत असताना मोदींनी काँग्रेस पक्षाला एक्स्पोज केलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, संविधानातील आरक्षणाला पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याचा कसा विरोध राहिलाय हे मोदींनी जगासमोर आणलं. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून नाटक केलं जात आहे.”
हेही वाचा >> Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
भारतरत्नही काँग्रेसने बाबासाहेबांनी दिलं नाही
“काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. जिथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं, त्या इंदू मिल येथे स्मारक व्हावं, याकरता इतके वर्षे आंदलने करावी लागली. पण काँग्रेसने सुईच्या टोकाएवढीही जागा दिली नाही. पण मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर आता तिथे स्मारक होतंय. लंडनमध्ये ज्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले, ते घर लिलावात निघालं होतं. काँग्रेसच्या सरकारच्या काळात अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका. पण आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही ताब्यात घेतलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम भाजपाने केलं, काँग्रेसला फक्त त्यांच्या नावाने राजकारण करायचं आहे. भारतरत्नही काँग्रेसने बाबासाहेबांना दिलं नाही”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.