राज्यावर आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा जोरदार फटका बळीराजाला बसला आहे. एका धक्क्यातून सावरतो न् सावरतो तोच दुसऱ्या आपत्तीने घेरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई पुरेशा प्रमाणात न मिळाल्याची टीका विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. तसंच पीकविम्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. या पीकविम्यासंदर्भात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही, आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले.
हेही वाचा – “बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “भागवत कराड हे वित्तराज्यमंत्री झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की पीकविमा आपल्या काळात मिळत होता, आता तो का मिळत नाही? यावर त्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली. त्या विमा कंपन्यांनी धक्कादायक सत्य आपल्यासमोर आणलं. ते म्हणाले, विमा देणार कसा? सरकारच्या हिश्श्याचे जे १७०० कोटी रुपये सरकारने भरायला हवे होते, त्यातला एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. तो जर भरला असता तर ४००० कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना दिले असते. पण जर पैसेच भरले नाहीत, तर विम्याचे पैसे येतील कसे? म्हणजे यांच्याकडे चैनीला पैसा आहे, पण शेतकऱ्यांना हक्काचे पैसे राज्य सरकार भरत नाही म्हणून शेतकरी संकटात आहे”.