Devendra Fadnavis New CM of Maharashtra Swearing Ceremony: विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अखेर ११ दिवसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरील मळभ दूर झाले आहे. आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. यामुळे आता त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी निरीक्षक पद भुषविलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर आभार प्रदर्शनाच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले. तसेच सरकार स्थापन केल्यानंतर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, असे सुतोवाच त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील विजयाचे श्रेय प्रदेश भाजपाच्या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिले. “भाजपा पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात असल्यामुळेच हा विजय मिळाला. तुम्ही सगळे आहात म्हणूनच मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी इथे नसतो. पुढची वाट ही आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपले महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन जावे लागेल. तसेच ज्यावेळी इतके मोठे बहुमत असते, तेव्हा सर्वांच्या मनातील गोष्टी पूर्ण करता येत नाहीत”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही गोष्टी मनाविरुद्ध होतील, पण…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आपण एक व्यापक दृष्टीकोन घेऊन राजकारणात आलेलो आहोत. केवळ पदांकरिता किंवा आपल्याला कुणीतरी मोठे करावे, म्हणून आपण राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे यापुढे चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, तर चार गोष्टी मनाविरुद्ध होतील. आपण सर्व एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे? हे पुन्हा दाखवून देऊ.”
देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवले. अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदे मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.