Devendra Fadnavis Sadabhau Khot: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवस उलटल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे आता स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आज देवेंद्र फडणवसी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीसच उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आज विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीपूर्वी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कविता म्हटली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
आज विधीमंडळ गटनेतेपदाच्या निवडीवेळी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत एक कविता म्हटली. ते म्हणाले, “रक्त सांडले जिथे मी रणांगनी सरदार होतो, त्याकारणे सिंहासनाचा मी हक्कदार होतो.” देवेंद्र फणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, “आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा नेता या राज्याच्या सिंहासनावर अश्वारूढ होण्यासाठी सज्ज झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्यामध्ये राज्याला पुढे घेऊन जाण्याची क्षमता आहे.”
कोण नाराज याच्याशी देणेघेणे नाही
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड होण्यापूर्वी काही क्षण आधी आमदार सदाभाऊ खोत यांना, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून असलेल्या नाराजीबाबत विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना खोत म्हणाले, “कोण नाराज आहे, याच्याशी जनतेला देणेघेणे नाही. जनतेला मुख्यमंत्रीपदी फक्त देवेंद्र फडणवीस हवे आहेत.”
हे ही वाचा : मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
चंद्रकांत पाटलांकडून फडवणीसांच्या नावाचा प्रस्ताव
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. चंद्रकांत पाटलांच्या या प्रस्तावाला अशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले.
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात मोठे यश मिळवले. यामध्ये भाजपाने १३२, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत.