२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेची (संयुक्त) युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत सरकार स्थापन केलं होतं. मात्र नंतरच्या काळात हे सरकार पडलं. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यावरून निर्माण झालेल्या वादातून शिवसेना भाजपाची युती तुटली, असं चित्र राज्यातील जनतेने पाहिलं. मात्र दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे काय चर्चा झाली होती? याबाबत दोन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंबरोबर झालेल्या चर्चा आणि युतीने घेतलेल्या निर्णयांचा घटनाक्रम सांगितला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१९ च्या निवडणुकीआधी जागावाटपावेळी मी आणि उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती. त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं, मुख्यमंत्रिपद तुम्हाला देता येणार नाही. आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ. काही मंत्रिपदं वाढवून देऊ. परंतु, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेता येणार नाही, माझ्या पक्षाला ते मान्य नाही. त्यावर उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘असं असेल तर ही बोलणी पुढे नेता येणार नाहीत.’ त्यानंतर आमची बोलणी तिथेच फिस्कटली. त्यानंतर तीन दिवसांनी मला पुन्हा एका मध्यस्थाकरवी उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवला आणि आम्ही दोघे पुन्हा चर्चेला बसलो.” फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘काही गोष्टी तुम्ही आम्हाला अधिकच्या देऊ शकलात तर आपलं बोलणं पुढे जाऊ शकतं’. मी त्यावर होकार दिला. त्यावर उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘आम्हाला पालघर लोकसभेची जागा द्या, आमच्या विधानसभेच्या काही जागा वाढल्या पाहिजेत, तसेच आम्हाला मागच्या वेळी केवळ १२ मंत्रिपदं दिली होती, यावेळी आम्हाला अधिक मंत्रिपदं हवी आहेत. काही कॅबिनेट मंत्रिपदं हवी आहेत. आमच्या मंत्र्यांचा पोर्टफोलिओ थोडा वाढवायचा आहे’. यावर मी केवळ ठीक आहे, आपण यावर चर्चा करू असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘आता अमित शाह यांनी एकदा मातोश्रीवर यायला हवं. त्यानंतर आपण एकत्र पत्रकार परिषद करू.’ त्यावर मी त्यांना विचारलं, अमित शाहांच्या भेटीमागचं कारण काय? त्यावर ते मला म्हणाले, ‘मला अमित शाह यांना माझ्या मनातील काही गोष्टी सांगायच्या आहेत. शेवटी आपला इतका वाद का झाला? बाळासाहेब ठाकरे असताना युतीमध्ये शिवसेनेला जी वागणूक मिळत होती ती वागणूक आम्हाला मिळत नाही. केंद्रात आम्हाला जी खाती हवी होती, ती मिळाली नाहीत. विधानसभेतही आम्हाला हवी तशी खाती मिळाली नाहीत. त्याबद्दल मला त्यांच्याशी बोलायचं आहे.’ त्यावर मी त्यांना होकार दिला आणि अमित शाहांशी बोललो”
उपमुख्यमंत्री म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. अमित शाह ‘मातोश्री’वर यायला तयार झाले. शाह मातोश्रीवर आल्यानंतर त्या दोघांनी (उद्धव ठाकरे आणि अमित शाह) काही वेळ एका खोलीत चर्चा केली. त्या चर्चेनंतर अमित शाह यांनी मला आत बोलावून घेतलं. मग मी आत गेलो. त्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘हे बघा देवेंद्र, मी आता यू टर्न घेतोय. परंतु, मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार? त्यामुळे मी आणि अमित शाह काही बोलणार नाही. तुम्ही एकटेच पत्रकार परिषदेत बोला. ते बोलत असताना शिवसैनिकांना वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं आहे. त्यामुळे जी भाषा तुम्ही वापराल ती समसमान वाटप करू अशा आशयाची असली पाहिजे.’ त्यास मी होकार दिला.”
“उद्धव ठाकरे म्हणाले, आमची आब्रू राहिली पाहिजे” :- फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पत्रकार परिषदेत वापरलेल्या समसमान शब्दाचा अर्थ त्यांना मंत्रिमंडळात अधिक जागा देणे, त्यांच्या मंत्र्यांना चांगला पोर्टफोलिओ देणे असा होता. उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘आमची इज्जत राहिली पाहिजे. मी यू टर्न का घेतला? हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे. आपल्याला काहीतरी मिळालं आहे म्हणून आपण हा यू टर्न घेत आहोत, असा संदेश शिवसैनिकांमध्ये गेला पाहिजे.’ मी सांगतोय त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. मी काहीही खोटं सांगत नाही. उद्धव ठाकरे मला म्हणाले, ‘मी इतकी टोकाची भूमिका घेतली होती आणि आता मात्र मी यू टर्न घेतोय, त्यामुळे तुमच्या वक्तव्यात ते नीट येऊ द्या. उद्धव ठाकरेंना होकार देऊन मी पत्रकार परिषदेत काय बोलेन ते त्यांच्यासमोर बोलून दाखवलं”
हे ही वाचा >> शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेची ताकद, तरी मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा का घ्याव्या लागतायत? फडणवीसांनी सांगितलं कारण
फडणवीस म्हणाले, “हे सगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले, देवेंद्र दोन मिनिट थांबा आणि त्यांनी वहिनींना बोलावलं. त्यानंतर रश्मी ठाकरे वहिनी तिथे आल्या, मी पत्रकार परिषदेत जे काही बोलणार आहे ते वहिनींसमोर पुन्हा बोलून दाखवलं. मग मी हिंदीत उजळणी केली. उद्धव ठाकरे आणि अमित शाह या दोघांनी मला होकार दिल्यानंतर आम्ही तिघे पत्रकार परिषदेला सामोरे गेलो. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितल्याप्रमाणे ते आणि अमित शाह काहीच बोलले नाहीत. मी एकटाच बोललो. मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आणि उद्धव ठाकरे जे काही बोलतात ते खोटं आहे. खरं बोलायला माणसाला विचार करावा लागत नाही. मात्र खोटं बोलायला रोज नवीन नवीन गोष्ट तयार करावी लागते.”