Devendra Fadnavis On Davos Visit : दावोस येथे गेल्या आठवड्यात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यामध्ये त्यांनी विविध कंपन्यांशी सुमारे १,६०,००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेकांनी गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये ज्या २९ कंपन्यांशी सामंजस्य करार झाले आहेत, त्यापैकी फक्त एकच कंपनी भारताबाहेरील असल्याचे म्हणत टीका केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही दावोसमध्ये केलेल्या सामजस्य करारांमध्ये ९८ टक्के थेट परकीय गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे.
त्यांची इच्छा असते की…
आज आज (४ फेब्रुवारी) ‘लोकसत्ता – वर्षवेध’च्या अंकाच्या प्रकाशनावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत भारतीय कंपन्यांबरोबर केलेल्या सामजस्य करारांबाबत प्रश्न विचारला होता.
याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जे हा आरोप करत आहेत, ते तिथे गेले होते तेव्हा त्यांनीही भारतीय कंपन्यांशीच करार केला होता. त्यांनी केलेले सामजस्य करार पाहिले तर त्यामध्ये थेट परकीय गुतवणूक नव्हती. आम्ही ज्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या त्यामध्ये ९८ टक्के थेट परकीय गुंतवणूक आहे. दावोस एक व्यासपीठ आहे, त्यामुळे जेव्हा तिथे जागतिक आर्थिक परिषद होते. तेव्हा जागतिक कंपन्या आपल्या बैठका तिथे घेतात. त्या सर्व कंपन्यांचे प्रमुख तिथे आलेले असतात. या सर्व भारतीय कंपन्या आहेत, ज्या थेट परकीय गुंतवणूक आणतात, बाहेरून पैसे आणतात त्यांची अपेक्षा अशी असते की, दावोसला जर काही करार केले तर त्यांचे परदेशी भागीदार तिथे उपस्थित असतात. म्हणून त्यांची इच्छा असते की, करार दावोसला व्हावेत.”
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता – वर्षवेध’ अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा, पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांवरून महायुतीत झालेला गोंधळ, पॉलिटिकल एक्सटोर्शन यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
दावोसमध्ये १५ लाख ७० हजार कोटी रुपयांचे करार
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) यंदा तब्बल १५ लाख ७० हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी विक्रमी सामंजस्य करार झाले असून त्यातील ९८ टक्के गुंतवणूक ही विदेशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच सांगितले आहे. यातून राज्यात १५ लाख ९५ हजार रोजगारनिर्मितीची अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली होती.