Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सरकारने आजवर एकाही रुपयाची तरतूद केलेली नाही”, अशी खंत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे. आज रायगडावर आयोजित एका कार्यक्रमात भोसले यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा तोच मुद्दा उपस्थित केला आहे. शिवरायांची ३४५ वी पुण्यतिथी व त्यांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज (१२ एप्रिल) रायगडावर आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना उदयनराजे भोसले यांनी त्यांची मागणी लावून धरली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते.
उदयनराजे भोसले यांची मागणी काय?
या कार्यक्रमावेळी उदयनराजेंनी पाच मागण्या मांडल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणावेळी सर्व मागण्या मान्य केल्या. उदयनराजे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. मात्र, आता राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ तरी ते स्मारक तयार करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक झालं पाहिजे ही देखील शिवभक्तांची मागणी आहे.”
आम्ही शिवरायांचे मावळे, हार मानणार नाही : देवेंद्र फडणवीस
उदयनराजेंच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. मात्र, त्यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यापैकी पहिली मागणी म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात आहे. मला सर्वांना सांगायचं आहे की ते स्मारक सर्वोच्च न्यायालयात अडकलं होतं. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवलं आहे. परंतु, आपणही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. उच्च न्यायालयात लढून स्मारकाचा मार्ग मोकळा करून घेऊ.”
दिल्लीत शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक उभारणार : मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे हाच आमचा प्रयत्न असेल. यासह मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन करतो की उदयनराजे भोसले यांनी केलेली आणखी एक मागणी महत्त्वाची आहे. दिल्लीतही छत्रपती शिवाजी महाराजांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवं. त्यासाठी आम्ही तुमच्याकडे येऊ. तुमच्या मदतीने दिल्लीत उचित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक बांधायचा प्रयत्न करू.”