काही दिवसांपूर्वी झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात नुकत्याच एका एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीच्या पदार्थांबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. अमृता फडणवीस यांना एका बैठकीत देवेंद्रजी किती किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस हे ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असं म्हटलं आहे. तर ३०-३५ पुरणपोळ्या ते कसे खातात हे पाहायची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर देताना ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटले होते. त्यापोठापाठ लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या असे सांगितले होते.

सकाळ समूहातर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर उत्तर दिले आहे. “हे बिलकुल खरे नाही. माझ्या लग्नाच्यावेळी पक्तींला बसलेलो असताना माझ्या मित्रांनी अमृता फडणवीस यांची गंमत केली की मला पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला. कधीतरी मी ३५ पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या असे मित्रांनी सांगितले. तेच अमृता फडणवीसांच्या डोक्यात होते. पण त्यांनी लग्नानंतर कधीही त्या खाल्ल्या नाही हेही सांगितले. पण हे खरं आहे की लग्नाच्या पूर्वी एकदा शर्यत लावून सात ते आठ पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. आता त्याही खाऊ शकत नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रोहित पवारांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघ मिसळ खातानाचे फोटो ट्वीट करत या प्रकरणावरुन टोला लगावला होता. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ३५ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाल्याचं म्हणत रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा काढला होता. तसेच मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केल्याचं सांगत भाजपाला ठाण्यातील वडापाव बिलच्या व्हायरल व्हिडीओवरून टोला लगावला होता.

Story img Loader