राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते आणि अनेक आमदारही अजित पवार यांच्यासोबत आहेत. मात्र अजित पवारांच्या या बंडखोरीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाही. असे असतानाच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?

“जे घडले, ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. याद्वारे महाराष्ट्रात आम्ही विकासाचा नवा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असे तिघेही मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ. आम्ही एक अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारे सरकार देऊ,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा नाही?

अजित पवार यांच्यासोबत सध्या ३० ते ४० आमदार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र अजित पवार यांच्या या बंडाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाही. तशी प्राथमिक माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. मी खंबीर आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत, असे शरद पवार यांनी संजय राऊतांना सांगितले आहे.

संजय राऊत यांनी काय माहिती दिली?

“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले ‘मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.’ होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही,” असे संजय राऊत ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

Story img Loader