शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कसिनोत बसलेला फोटो शेअर केला. तसेच महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राऊतांच्या या पोस्टवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या पोस्टमधून राऊतांची विकृत मानसिकता दिसते, असा हल्लाबोल केला. ते सोमवारी (२० नोव्हेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं.”
“पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे…”
“संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.
“हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे”
“व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी केली.
हेही वाचा : “आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या या ग्लासमध्ये…”; भाजपाचं राऊतांना प्रत्युत्तर
संजय राऊतांनी काय म्हटलं होतं?
‘एक्स’ ( ट्वीटर ) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संजय राऊतांनी फोटोसह सलग तीन ट्वीट केले. त्यात ते म्हणाले, “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”
“खेळले तर बिघडले कोठे?”
“१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय”
“ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊ ला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!,” असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.