गेल्या सात दिवसांपासून राज्यभर शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. अखेर आज हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. हा संप मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याची बातमी मला तुमच्याकडूनच समजली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता, तो आम्ही समजून घेतला आहे. यामध्ये आम्ही कुठेही अहंकार न ठेवता त्यांच्याशी संवाद साधला.”
हेही वाचा- अनिल जयसिंघानीला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत आणलं होतं? आदित्य ठाकरे म्हणाले…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “कर्मचाऱ्यांना जे सामाजिक संरक्षण हवं आहे. त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भात जे तत्व आहे, ते आम्ही मान्य केलं आहे. याची कार्यवाही कशी करायची, यासाठी एक समिती काम करत आहे. सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे.”
“ही समिती तीन-चार ठरलेल्या मुद्द्यांवर अहवाल सादर करेल. त्या अहवालाच्या आधारावर आम्हाला पुढची कारवाई करता येईल. संवादातून तोडगा निघतो, असं आम्ही सातत्याने म्हणत होतो. आता संवाद झाला आहे. त्यामुळे मी कर्मचाऱ्यांचं स्वागत करतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे, समितीने अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.