Devendra Fadnavis Interview: महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वात महत्त्वाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू वृत्ती व हजरजबाबीपणा सर्वशृत आहे. मुद्दा समजावून सांगण्याची त्यांची हातोटी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दिसते तशीच ती विधानसभेच्या पटलावरही दिसून येते. अनेकदा मुलाखतींमध्ये देवेंद्र फडणवीस अत्यंत क्लिष्ट व अडचणीच्या राजकीय प्रश्नांवरही याच वृत्तीमुळे मिश्किलपणे उत्तर देताना आढळतात. त्यांचा हाच स्वभाव नुकत्याच त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिसून आला.

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये नुकतीच एक सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. त्यात अजित पवारांशी केलेली युती, त्यानंतरची टीका, लोकसभा निवडणुकीतील अपयश, विधानसभा निवडणुकीची तयारी अशा अनेक प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली. मात्र, मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!

देवेंदर नाही, देवेंद्र!

मुलाखतीच्या सुरुवातीलाच मुलाखतकार पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना व त्यांना संबोधताना ‘देवेंद्र’ असं न म्हणता ‘देवेंदर भाई’ असा उल्लेख केला. आपला प्रश्न पुढे पूर्ण करण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हटकलं. “एक रिक्वेस्ट करता हूँ. देवेंदर नहीं, देवेंद्र. शुद्ध मराठी आदमी हूँ भय्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. प्रश्न विचारणाऱ्यांनी फडणवीसांच्या या हजरजबाबीपणाला हसून दाद दिली.

“फक्त नावात थोडी चूक झाली म्हणून…”

‘मराठी अभिमान म्हणून का?’ असा प्रश्न विचारताच लागलीच फडणवीसांनी पुन्हा एकदा उपस्थितांकडून हास्याची लकेर वसूल केली. “आम्ही पूर्ण देशाला एक मानतो. फक्त नावात थोडी चूक झाली म्हणून सांगतोय”, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबाबत त्यांनी भाष्य केलं. भाजपाच्या राज्यातील जागा या निवडणुकीत २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्यावरून भाजपामध्ये कामगिरीबाबत चर्चा सुरू झाली असताना फडणवीसांनी त्यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. भाजपा राज्यात कमजोर झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis Interview: शिंदे गट, अजित पवार गट म्हणतात “आम्हीच मूळ पक्ष”, पण फडणवीस म्हणतात “हे दोन्ही नवे पक्ष”!

“भाजपाला कमकुवत म्हणणं हे चुकीचं विश्लेषण आहे. ज्यानं हे विश्लेषण केलं त्यांना पुन्हा नव्याने विश्लेषण करायला शिकवावं लागेल. भाजपानं ९ जागा जिंकल्या. १२ जागांवर भाजपा ३ टक्क्यांपेक्षा कमी फरकानं हरली आहे. पूर्ण विश्लेषणात आम्हीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. आम्हालाच सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे भाजपा सगळ्यात कमकुवत पक्ष आहे असं बोलणं चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“स्ट्राईकरेटला काही महत्त्व नाही”

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा लढवल्या, त्या प्रमाणात जागा जिंकून आणण्यात अर्थात स्ट्राईकरेटमध्ये भाजपा मागे पडल्याबाबत विचारणा केली असता त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. “स्ट्राईकरेटला काही महत्त्व नाही. आकडे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही सांगू शकता. कुणी व्यक्ती एका बॉलमध्ये चार धावा काढून बाद झाला तर त्याचा स्ट्राईक रेट जास्तच राहणार आहे. स्ट्राईकरेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. दुसरा बिचारा १०० धावा करूनही स्ट्राईकरेटमध्ये ८०वरच राहू शकतो. महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष भाजपा होता, भाजपा आहे आणि भाजपाच राहील”, असं ते म्हणाले.