विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सध्या त्यांना भरपूर वेळ आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात विरोधी पक्षनेते फडणवीस यांना लगावला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच ऑफर होती असे बोलून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यासंदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. मात्र भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी सांगितलं की शिवसेना सोडून हे आपल्याला करता येणार नाही. शिवसेना सोबत राहून जर राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर घेऊ असंही तेव्हा ठरलं होतं. चर्चा बऱ्याच पुढे गेल्या होत्या मात्र नंतर ते सगळं प्रकरण थंड बस्त्यात गेलं असं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
आणखी वाचा- ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी नाकारलं, अशांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही : पवार
तसेच, अजित पवारांसोबत मी जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचे शिल्पकार अमित शाहच होते असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र आम्ही अर्ध्या रात्री फोन करु शकतो ते अमित शाह यांना. कारण सगळ्या गोष्टी आम्ही मोदीजींपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा खूप चांगला संपर्क आहे. तसंच मागची पाच वर्षे आणि आजही आमच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘कोलाज विथ राजू परुळेकर’ या मुलाखतीत ते बोलत होते.
आणखी वाचा- भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवार, अजित पवारांच्या भेटीला
आज शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल असताना त्यांनी, पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केल्याचे दिसले. साताऱ्यात ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.