शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्यांचं निधन झालं. यानंतर कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी काल रात्री विनायक मेटेंनी सव्वादोन वाजता फडणवीसांना मेसेज केला होता, तो आपण आज सकाळी वाचल्याचंदेखील फडणवीसांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत”
“आजचा दिवस दु:खद घटनेनं सुरू झाला. सकाळी मला मेसेज आला की अपघात झाला आहे. पण त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मी माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मराठा आरक्षणावर मेटेंचा मोठा अभ्यास”
“गरिबीतून वर येऊन स्वत:च्या जिवावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला त्यांचा मोठा अभ्यास होता. माझे ते अत्यंत जवळचे सहकारी होते. गेली ८-१० वर्ष आम्ही जवळून काम केलं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “अतिशय तळमळीचा नेता होता. कधीही न भरून निघणारी ही पोकळी आहे. त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. शिवसंग्राम परिवारासाठीही हा मोठा धक्का आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश!
मेटेंचा फडणवीसांना रात्री सव्वादोन वाजता मेसेज
दरम्यान, विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज पाठवल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. “काल रात्री सव्वादोन वाजता त्यांनी मला मेसेज केला की ‘मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे, त्यासाठी मी येतोय. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो’ असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. मी आज सकाळी तो मेसेज वाचला”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.