Devendra Fadnavis Government 100 Days Performance: “इंग्रजीत एक म्हण आहे.. टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड. याचा अर्थ दोघांनी एकत्र असणं सहवासाचा आनंद असू शकतो, तिघं एकत्र असणं ही गर्दी असू शकते” अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर परखड शब्दांत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात येऊन लवकरच १०० दिवस पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने गिरीश कुबेर यांनी सरकारच्या या १०० दिवसांच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूला तीन-तीन पक्षांची युती वा आघाडी आहे. त्यातले तीन पक्ष सत्तेत असून दुसरे तीन पक्ष हे विरोधात आहेत. मात्र, सत्तेत असूनही महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या अस्वस्थता दिसत असल्याचं विवेचन गिरीश कुबेर यांनी केलं आहे. विरोधातल्या तीन पक्षांमध्ये अस्वस्थता असणं समजू शकतो, पण सत्तेत असूनही त्या तीन पक्षांमध्ये अस्वस्थता असण्याचं कारण नाही. ही स्थिती महाराष्ट्राच्या विकासासाठी बाधक ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचं राजकारण!

दरम्यान, सत्ताधारी महायुतीबाबत गिरीश कुबेर यांनी भाष्य करताना क्रमांक दोन व क्रमांक तीन अर्थात एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कुरघोड्यांच्या राजकारणाचा क्रमांक एकचा पक्ष अर्थात भारतीय जनता पक्षाला मनस्ताप होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पालकमंत्री निवड किंवा धोरणात्मक निर्णयांबाबत त्यामुळेच विसंवाद दिसत असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात गिरीश कुबेर यांनी या तिन्ही पक्षांच्या अंतर्गत राजकारणावर ‘दृष्टीकोन’मध्ये भूमिका मांडली आहे.

पुढच्या महिन्यात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्या पार्श्वभूमीवर सत्तेतल्या तिन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता बाजूला सारून राज्याचा विचार करून तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन धोरणाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, असंही गिरीश कुबेर यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader