शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य तसेच देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांना दीर्घयुष्य लाभावे अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे. मात्र शुभेच्छा देताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख ऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. एकीकडे शिंदेंच्या या ट्वीटची चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना पक्ष संघटनेवरील वर्चस्वाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे आणि तसेच उद्धव ठाकरे समर्थक गट यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांनी आमच्या पाठीत खंजीक खुपसला असा आरोप उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. हा वाद सर्वोच्च न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष नेमका कोणाचा हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मीज मुख्यमंत्री म्हटले आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणण्याचे टाळले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशामध्ये नेमके काय आहे?
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे. “माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो,” असे फडणवीस आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.