Devendra Fadnavis पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कारण दहशतवाद्यांनी २२ तारखेला केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. हे सगळे पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. त्यांची काहीही चूक नसताना त्यांना ठार करण्यात आलं. ज्यानंतर भारताने पाच मोठे निर्णय घेतले आणि पाकिस्तानी नागरिकांना आपला देश सोडण्यासाठी २८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत अशी चर्चा सुरु होती ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

भारताने घेतलेले निर्णय काय?

१) १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.

२) संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.

३) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील.

४) एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.

५) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा.
भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे निर्णय भारताने घेतले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. २२ एप्रिलच्या दिवशी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत सतत बैठकांचं सत्र सुरु होतं. पंतप्रधान मोदींनी बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची ची सुमारे २ तास बैठक घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान महाराष्ट्रात काही पाकिस्तानी नागरिक हरवल्याची चर्चा सुरु होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

“मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे. एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सगळे बाहेर चालले आहेत. सगळ्यांची घालवायची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सगळ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.