मुंबईतला हिरे व्यापार सुरतला नेला गेला असा आरोप झाला त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईतला हिरे व्यापार करोना काळात आठ महिने कसा बंद होता हेदेखील त्यांनी सांगितलं आणि डायमंड बोर्स सूरतला का झाला ते देखील सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मुंबईतला हिरे व्यापार सूरतला नेला गेला असा विषय मांडण्यात आला. आपल्याला कल्पना आहे की सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हिरे व्यवसाय आहे. डायमंड बोर्स २०१३ मध्येच सुरु झालं आहे. आता त्यातल्या एका नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. दोन्ही डायमंड बोर्सच्या कार्यपद्धतीत फरक आहे. सूरतमध्ये उत्पादन होतं आणि आपल्याकडे उत्पादन आणि निर्यात होते. सूरतला नवा बोर्स सुरु केला असला तरीही आपल्याकडून एकही उद्योग तिथे शिफ्ट झालेला नाही. मुंबईतल्या भारत डायमंड गुड्सच्या लोकांनी सांगितलं आम्ही कुणीही शिफ्ट होणार नाही. उलट आपल्याकडे हिरे उद्योग वाढतो आहे. भारतात ३८ बिलियन जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही आपण एकट्या मुंबईतून करतो. त्यात सूरतचा वाटा १२ टक्के आहे, जयपूरचा वाटा ३.११ टक्के आहे. तर ९७ टक्के निर्यात एकट्या मुंबईतून होते.

करोनाच्या काळात आठ महिने निर्यात बंद होती

आपण करोनाच्या काळात आठ महिने व्यापार बंद होता. २०२०-२०२१ या वर्षात आपली निर्यात ९४ टक्क्यांवर अशी खाली आली. २ टक्क्यांची सूरतची निर्यात सात टक्क्यांवर गेली. मी देखील तेव्हा माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. त्यांनी ती संमती शेवटी दिली. आपण आठ महिने व्यापार बंद ठेवला होता. मात्र करोना संपल्यावर २०२२-२०२३ आणि २०२३-२०२४ मध्ये ९७.१३ टक्क्यावर मुंबईवर गेली आहे. मुंबईत आपण जेम्स आणि ज्वेलरी पार्कला जागा दिली आहे. २० एकर जागा महापे या ठिकाणी दिली आहे. देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क आपण करतोय. इटली आणि तुर्की या ठिकाणी असलेल्या पार्कप्रमाणेच तो पार्क असणार आहे. “

मुंबईत उत्पादन केंद्र करायचं ठरलं आहे

“मुंबईत उत्पादन केंद्र करायचं ठरलं आहे. जे पार्क आपण करतोय त्यात सवलती दिल्या आहेत. देशातली सर्वात मोठी कंपनी मलबार गोल्ड यांनी १७०० कोटींची गुंतवणूक मुंबईत केली. तनिष्कनेही आपल्याकडे गुंतवणूक केली आहे. तुर्की डायमंड बोर्स यांनीही मुंबईत येण्याचं नक्की केलं आहे. २०३० पर्यंत हिरे व्यापार ७५ मिलियन डॉलर्सवर नेण्याची घोषणा ही आपल्या पंतप्रधानांनी केली आहे. त्याचा प्रमुख फायदा महाराष्ट्र आणि मुंबईला होणार आहे. अन्य राज्येही प्रयत्न करतील पण त्याचा मुंबईवर कुठलाही परिणाम झालेला नाही. मुंबईशी स्पर्धा कुणीही करु शकत नाही. त्यामुळे मुंबईतले उद्योग सूरतला जातील ही भीती मनातून काढून टाका. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis important statement about mumbai dimond market and surat scj