लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपाच्या अवघ्या ९ जागा आल्या आहेत. तर महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न भाजपात सुरु आहेत. अशात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक आहेत असं म्हटलं आहे. तसंच त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस पेशवाईतल्या आनंदीबाईप्रमाणे वागले

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहेत. महाराष्ट्रात सूडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं. ते यापूर्वी कधीच नव्हतं, लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या फडतूस राजकारणाचा बदला घेतला. मराठी माणसाला महाराष्ट्राचा नाश करणारं राजकारण नको होतं. आता जे देवेंद्र फडणवीसांच्या मागे धावत आहेत ते सगळे चमचे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक

मी अत्यंत कटुतेने बोलतो आहे. कारण राजकारणातली पिढी संपवायचं काम फडणवीसांनी केलं. हातातल्या सत्तेचा वापर राजकारणात सूड घेण्यासाठी केला. न्यायालयांवर दबाव आणला, न्यायमूर्तींवर दबाव आणला, धमक्या देण्यात आल्या. पोलिसांचा वापर राजकीय कामांसाठी केला. या सगळ्याचा उद्रेक होतोच. आज लोकांनी त्यांना उत्तर दिलं. जेवढा राग मोदी शाह यांच्यावर नाही तेवढा देवेंद्र फडणवीसांवर आहे. विदर्भात नितीन गडकरींची जागा सोडली तर विदर्भात फडणवीसांची भाजपा रसातळाला गेली. राजीनामा द्यायची गरज काय? लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं आहे. सूडाचं, जाती-धर्माचं राजकारण सुरु करुन राज्य रसातळाला नेलं. आधी त्यांनी स्वतःच्या घरात काय झालं आहे ते फडणवीसांनी बघावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याचा विचारही करु नये, अन्यथा महाराष्ट्रातलं सरकार..”, छगन भुजबळ काय म्हणाले?

जे पक्ष फडणवीसांनी फोडले त्यांनीच त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली

नवाब मलिक, अनिल देशमुख यांना जाऊन भेटा, महापालिकेतल्या लोकांवर खोट्या कारवाया केल्या. आज त्यामुळेच त्यांच्यावर रडण्याची वेळ येईल. मी पुन्हा येईन, दोन पक्ष फोडून येईन जे दोन पक्ष त्यांनी फोडले त्याच पक्षांनी त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. अजून तुम्हाला बरंच काय काय बघायचं आहे. जे काही करायचं आहे ते करा पण महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिलं जाईल. तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीत, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावलीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही फोडलीत, याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहिल सातत्याने असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुणीही त्यांनी त्यांच्या पक्षात काय करावं हा आमचा प्रश्न नाही. पण महाराष्ट्रात त्यांनी दळभद्री आणि घाणेरडं राजकारण केलं, लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखवली. ज्या गुदगुल्या त्यांना काही काळ झाल्या त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदींवरही संजय राऊत यांचं भाष्य

माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी ज्या रुबाबात मोदी पुढे जात होते ते चित्र आज दिसत नाही. मोदींची भाषा बदलली आहे. बॉडी लँग्वेज बदलली आहे. संघाचा विरोध आहे, पक्षांतर्गत विरोध आहे. मोदी एका अर्थाने पराभूत झालेत असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis is the villain of maharashtra politics said sanjay raut also slams him for politics scj