महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ४० खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत त्यामुळे मला आलेल्या धमकीबद्दल आणि सामना कार्यालयात झालेल्या पोलिसांच्या दमदाटीबद्दल मी त्यांना भेटणार नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी नाशिकला असताना माझं पोलिसांशी बोलणं झालं होतं. त्यांना मी हे सांगितलं होतं की मी नाशिकमध्ये आहे तेव्हा तुम्ही आत्ता येऊ नका. तरीही पोलीस आले आणि त्यांनी दमदाटी केली. प्रिंट केलेले कागद आधीच त्यांच्याकडे होते. त्यावर जबदस्तीने सह्या घेण्यात आल्या. मी हा सगळा प्रकार पोलीस आयुक्तांना कळवणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय म्हणाले?
मला जी धमकी आली आहे त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना कळवलं होतं. आता पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात मी नसताना घुसून जी दमदाटी केली त्याबद्दल मी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिणार आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटणार का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांना मी भेटणार नाही कारण ते चाळीस खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत. त्या दबावातच ते काम करत आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे.
आशिष शेलारांनाही टोला
आशिष शेलार माझ्या विरोधात बोलले असं ऐकलं. ते पक्षात कुठल्या पदावर आहेत? मला माहित नाही त्यामुळे ते काय म्हणाले याला मी महत्त्व देत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंनी वारंवार आम्हाला सांगितलं होतं की..
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बऱ्याचवेळा चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे बंड करणार अशी कुणकुण लागल्यानंतरही चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी हे आम्हाला सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत पक्षाशी बेईमानी करणार नाही. पक्षनिष्ठा बाळगेन असं सांगितलं होतं. मात्र ते भलतंच वागले. एकनाथ शिंदे हे आमचे विश्वासू सहकारी होते. तरीही त्यांनी असं वागून दाखवलं. एकनाथ शिंदेंकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. मतभेद असतात, वाद असतात तरीही शिंदे यांनी असं केलं. त्यांच्यामागे कुठल्या महाशक्तीचा दबाव त्यांच्यावर होता हे आता जगाला समजलं आहे. माझ्यावर सध्या गुन्हे दाखल केले जात आहेत काही हरकत नाही मी घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.