आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यभर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीतील पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं, तसेच महायुतीची आगामी निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली. यासह त्यांनी महायुतीतील पक्षांच्या प्रवक्त्यांना खडे बोल सुनावले. फडणवीसांनी माहायुतीच्या प्रवक्त्यांना निवडणूक काळात एकमेकांच्या पक्षांविरोधात, नेत्यांविरोधात न बोलण्याची तंबी दिली.
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवर कशी मात करता येईल याबाबतचं मार्गदर्शन केलं. फडणवीस म्हणाले, “आपल्या सरकारने राज्यात २४ नव्या योजना आणल्या, मी त्या सगळ्या आता सांगत बसत नाही. कारण सर्व योजना सांगत बसलो तर वेळ जाईल आणि ‘पुढचं पाठ मागचं सपाट’ अशी तुमची स्थिती होईल. त्या योजना तुमच्या लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की आपण आणलेल्या, लागू केलेल्या सर्व योजनांची माहिती घ्या, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. कारण लोकांना समजलं पाहिजे की त्यांच्यासाठी कोण काम करतंय? कोण काम करणारा नेता आहे आणि कोण बोलबच्चन आहे? ही गोष्ट जर लोकांच्या लक्षात आली तर निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला काहीच करावं लागणार नाही.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण शहरांमध्येही अनेक कामं केली. शहरांचा विकास केला. आता शहरांसाठी केलेली कामं मी सांगत बसत नाही. ती सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. कारण त्यासाठी अर्धा तास लागेल. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपल्या सरकारच्या काळात राज्यातील शहरांचा चेहरामोहरा बदलू लागलो आहोत. शहरांना विकासासाठी भरपूर पैसे दिले आहेत. त्यामुळे आपण किती कामं करतोय? कोण काय काम करतंय? हे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा, एवढीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आता आपण सर्वांनी आपल्या कामाचा प्रवक्ता व्हायला हवं. हिंदीमध्ये पत्रकारांना संवाददाता असं म्हटलं जातं. तसंच आता आपण संवाददाता व्हायला पाहिजे. मी सर्व पक्ष, त्या पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि की आपण जी जी काम केली ती लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांशी संवाद करा, संवाददाते व्हा.”
उपमुख्यमंत्री म्हणाले, मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रवक्त्यांना विनंती करतो की आपल्यामध्ये समतोल ठेवा. आज आपले प्रवक्ते एकमेकांविरोधात काय काय बोलतात ते सगळं आता बंद केलं पाहिजे. बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यांवरून आपला आपापसात विसंवाद असल्याचं दिसतं. त्यामुळे कुणाला जर बोलायची खुमखुमी आलीच असेल तर त्याने त्याच्या नेत्यांकडे जाऊन विचारायला हवं. त्यांनी आपल्या नेत्याला जाऊन विचारावं की मला बोलायची खुमखुमी आली आहे, मी बोलू का? तुमचे नेते जर तुम्हाला हो म्हणाले तर तुम्ही बोलून तुमची खुमखुमी दूर करून घ्या. आम्हाला काहीच अडचण नाही. परंतु, एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे.
हे ही वाचा >> “कांदा निर्यात बंदी करू नका, त्याने अनेकांना…”, अजित पवारांची पीयूष गोयल यांना विनंती
शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाड, शिवसेना नेते रामदास कदम, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, भाजपा आमदार नितेश राणे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही वक्तव्यांमुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळे फडणवीसांचा रोख या नेत्यांकडे होता का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.