राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना राजकीय वर्तुळातून देखील त्यांना सत्ताधारी आणि विरोधी नेतेमंडळींनी देखील शुभेच्छा दिल्या. आता डिस्चार्ज झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसेच, संबंधित विषयाबाबत “ठोस निर्णय घेऊन दिलासा द्याल” अशी अपेक्षा देखील फडणवीसांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
नेमका काय आहे विषय?
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या छपाईचे आदेश देऊन देखील ती होत नसल्याचं वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केलं होतं. या साहित्याच्या प्रकाशनासाठी राज्य सरकारने २०१७मध्ये आदेश दिल्यानंतर ५ कोटी ४५ लाखांचा कागदही खरेदी केला. मात्र, तो तसाच पडून असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात लोकसत्ताने दिलेलं वृत्त मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका म्हणून दाखल करून घेण्याचे निर्देश निबंधकांना दिले आहेत. याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
“आपल्यावरील शस्त्रक्रियेनंतर आपण घरी परतलात, हे ऐकून आनंद झाला. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेच्या प्रकाशन कार्याची प्रचंड दुरवस्था होत आहे. आपण तातडीने या कामात लक्ष देण्याची आणि त्यादृष्टीने संबंधितांना निर्देश देण्याची नितांत गरज आहे”, असं फडणवीसांनी या पत्रात म्हटलं आहे.
2017 मध्ये राज्यात आमचे सरकार असताना यांच्या मुद्रण आणि प्रकाशनासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला होता. या तीन खंडांच्या सुमारे 13 हजारावर अंकांची छपाई करून त्याचे वितरण सुद्धा सुरू करण्यात आले होते. अनेक ग्रंथांचे प्रकाशन आमच्या काळात करण्यात आले. काही ग्रंथांच्या 50 हजार प्रती छापून त्याचे वितरण सुद्धा झाले. मात्र, तदनंतरच्या काळात गेल्या 4 वर्षांत केवळ 20 हजार अंकांचीच छपाई होऊ शकली आहे आणि या अंकांची प्रचंड मागणी असताना सुद्धा वाचक, अभ्यासक, विद्यार्थी यांना त्यासाठी खोळंबून रहावे लागत आहे.
“..तर ही बाब अतिशय गंभीर आहे”
“आमचे सरकार असताना भाषणांच्या ९ खंडांच्या प्रत्येकी १ लाख प्रतींची छपाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे ५.५ कोटी रूपयांच्या कागदाची खरेदी सुद्धा करण्यात आली होती. मात्र, केवळ मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या अभावातून हे काम रखडत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. ९ लाख प्रतींच्या बदल्यात केवळ 20 हजार अंकांची छपाई हे प्रमाण अजीबातच पटण्यासारखे नाही”, असं देखील फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य छपाईचा पाच कोटींचा कागद वापराविना
“मागणी असून ग्रंथच उपलब्ध नाहीत”
“मला वाटते की, किमान या कामात तरी खर्च आणि मनुष्यबळाच्या निर्बंधाचे मापदंड लागू नयेत. मोठ्या प्रमाणात मागणी असताना ग्रंथच उपलब्ध नसणे, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आपण तातडीने या विषयात लक्ष घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथछपाईतील ढिसाळपणा दूर करावा, ही आग्रहाची विनंती आहे. सोबतच गतीने त्या ग्रंथांचे वितरण होईल, याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. त्या आधी काही ठोस निर्णय घेऊन आपण दिलासा द्याल, अशी अपेक्षा आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.