महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज शोकप्रस्तावानंतर स्थगित करण्यात आलं. त्यामुळे सभागृहात अद्याप दोन्ही बाजूंनी आक्रमक मुद्दे उपस्थित झाले नसले, तरी सभागृहात उपस्थित राहिलेल्या सदस्यावरून मात्र सत्ताधाऱ्यांमध्येच आपापसात विसंवाद किंवा मतभेद निर्माण झाल्याचं चित्र उभं राहिलं आहे. त्यामुळे विरोधकांनीही यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. बराच काळ तुरुंगात राहिलेल्या नवाब मलिक यांच्या उपस्थितीमुळे हा वाद निर्माण झाला असून त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच मुद्द्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ पत्र..
देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या उपस्थितीवरून अजित पवारांना पत्र लिहिलं आणि ते पत्र लगेच सोशल मीडियावरही पोस्ट केलं. नवाब मलिक यांना अजित पवार गटामध्ये समाविष्ट करून घेण्यावर देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, “सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा”, असा सूचक संदेशही त्यात दिला. शेवटी “आमच्या भावनांची आपण नोंद घ्याल”, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं. या पत्रावरून सध्या वाद निर्माण झाला असून फडणवीसांनी पत्र जाहीर करायला नको होतं, वैयक्तिक भेट घेऊन सांगायला हवं होतं अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून आली आहे. त्यावर आता जयंत पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“…असा प्रयत्न या पत्रात दिसतोय”
हे पत्र म्हणजे फडणवीसांचा बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. “उपमुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन नंबर आहे असं दिसत नाहीये. असे प्रश्न फोनवर सांगायला हवेत. त्यासाठी पत्र लिहायला लागणं हे आश्चर्य आहे. जी माहिती माझ्यामते ते फोन उचलून अजित पवारांना देऊ शकले असते. पण त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करायला प्राधान्य दिलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“हे पत्र एका उपमुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी आहे की आपली बाजू स्वच्छ करण्यासाठी, आम्ही त्यातले नाहीत हे सांगण्यासाठी आहे हा अभ्यास करण्याचा विषय आहे. भाजपाची अडचण झाली आहे असं दिसतंय. टायमिंग साधण्याचा विषय फार लांब आहे. त्यामुळे आपली बाजू स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न भाजपाकडून या पत्राद्वारे दिसतोय”, असंही जयंत पाटील म्हणाले.
“सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना…”; फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांची खोचक टीका!
अमोल मिटकरींनीही व्यक्त केली नाराजी
दरम्यान, एकीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला असताना अमोल मिटकरींनी मात्र तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
विशेष अग्रलेख – नवाब मलिक नकोत; पुढे?
“हे पत्र सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस स्वत: अजित पवारांना भेटून ती गोष्ट सांगू शकत होते की आम्हाला नवाब मलिक चालणार नाहीत. शेवटी नवाब मलिक पक्षाचे मोठे नेते आहेत. ते संकटाच्या काळात पक्षाच्या सोबत राहिले आहेत. तो आमच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे. नवाब मलिक आमच्यासोबत असावेत की नसावेत, यावर त्यांनी भाष्य करू नये”, अशा शब्दांत मिटकरींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.