राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये गेल्या १० दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या प्रयत्नात दिसला, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात होतं. काही विविध मुद्द्यांवर आक्रमक असणारे सत्ताधारी व विरोधक काही प्रसंगी मिश्किल टिप्पणी, कोपरखळ्या, टोले मारतानाही दिसून आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत अशीच टोलेबाजी दिसून आली. तिच्या केंद्रस्थानी होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं विधानपरिषदेत?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत सविस्तर भाषण केलं. यावेळी विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले नसल्याचं म्हणत विरोधी पक्षांवर टीका केली. मात्र त्याचवेळी भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी तो मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांचे आपण आभार मानत असल्याचं फडणवीस म्हणाले.

“उद्धव ठाकरेंचं दर्शन घडलं हेच…”, अधिवेशनात दोन दिवस हजेरी लावणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांचा टोला

“विरोधकांकडून विदर्भाच्या विकासाचा प्रस्ताव येईल असं वाटलं होतं. पण तो काही आला नाही. मी प्रविण दरेकरांचं त्यासाठी विशेष अभिनंदन करेन की त्यांनी हा मुद्दा मांडला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांचा टोला, फडणवीसांची टोलेबाजी!

दरम्यान, फडणवीसांनी प्रविण दरेकरांचं कौतुक केल्यानंतर समोरच्या बाकांवरून काही विरोधी पक्ष आमदारांनी “आता त्यांना मंत्री करा” म्हणत देवेंद्र फडणवीसांना कोपरखळी मारली. त्यापाठोपाठ फडणवीसांनी “आमच्या पक्षात मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो” म्हणत टोलेबाजी केली!

“आमच्या पक्षात मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो. एक लक्षात ठेवा. आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची. हरएक के अच्छे दिन आएंगे”, असं फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

“…तर मोदींनी बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेलांचंही निलंबन केलं असतं”, ठाकरे गटाचं टीकास्र!

गिरीश महाजन म्हणतात…

एकीकडे फडणवीस सगळ्यांनी आशा ठेवावी असं म्हणत असताना त्यांच्यामागे बसलेले मंत्री गिरीश महाजन यांनी लागलीच “सीनिअर लोकांनीही आशा ठेवावी का?” असा प्रश्न बसल्या-बसल्याच विचारला. त्यावरही फडणवीसांनी टोला लगावताना “गिरीशभाऊ म्हणतायत सीनिअर लोकांनी पण आशा ठेवायची का? आपण सीनिअर लोकांचा स्कोप थोडा कमी केलाय”, असं म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis light moment in vidhan parishad on cm post in bjp assembly winter session pmw