राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपाच्या हाती पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी मागील अडीच वर्षांमध्ये भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका बजावत महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विरोधी बाकावर असताना सत्तापरिवर्तन व्हावे असे का वाटत होते याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. या सरकारने सर्व प्रकल्पांना स्थगिती दिली. तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक दिवसही झोपू द्यायचे नाही, अशी पहिल्या दिवसापासून मनात खूणगाठ बांधली होती, असे फडणवीस यांनी सांगितले. ते नवी मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
हेही वाचा >>> “मातोश्रीविरोधात बोलणार नाही असं ठरवलं होतं, पण…” गद्दारीवरून संजय शिरसाट यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
“सरकार नेमकं कोण चालवत आहेत, हे जनतेच्या लक्षात येत नव्हते. हे सरकार भगवान भरोसे सुरु आहे, असे मी सांगायचो. काही लोकांना वाटत असेल, की आम्ही सत्तेसाठी परिवर्तन केलं. पण हे परिवर्तन सत्तेसाठी नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्रगतीचे सर्व कार्यक्रम ठप्प झाले. सर्व प्रकल्पांवर स्थगिती देण्यात आली. केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये दिलेले सर्व प्रकल्प बंद करण्यात आले. त्यामुळे खुर्चीसाठी नव्हे तर ही अवस्था पाहून राज्यात परिवर्तन व्हावे असे वाटायचे. केवळ बदला घ्यायचा आणि भ्रष्टाचार करायचा यासाठी हे सरकार चालवणार असतील, तर त्यांना एक दिवसही झोपू द्यायचे नाही; अशी पहिल्या दिवसापासून मनाशी खूणगाठ बांधली होती,” असे देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.
हेही वाचा >>> “तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट
“छत्रपती शिवाजी महाराज गड जिंकल्यानंतर कधीही थांबायचे नाही. गड जिंकून ते पुढच्या गडाकडे मार्गक्रमण करायचे. आपल्यालाही तेच करायचे आहे. आपणही महाराष्ट्रातील सत्तेचा गड जिंकलो आहोत. सत्ता हे आपलं साध्य नसून साधन आहे. हा गड आपण जिंकलो असलो तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विकासाच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणणे हा गड जिंकल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही,” असेही फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
हेही वाचा >>> “राज ठाकरेंसोबत होतो म्हणून मंत्रिपद दिलं नाही,” रामदास कदम यांचा गंभीर आरोप
“मला अनेक लोक विचारतात की हे कसं घडलं. मी त्यांना सांगतो की हे सरकार यावं ही श्रींची इच्छा होती. महाराष्ट्रातील १२ कोटी जनता ही ईश्वर आहे. आपले सरकार यावे, ही येथील जनतेची इच्छा होती. जनतेच्या मनातील इच्छा आपण पूर्ण केली आहे. आता आपण मोकळा श्वास घेत आहोत. गेली अडीच वर्षे संघर्षात गेली. मागील सरकारने अडीच वर्षे फक्त सूड उगवण्याचं काम केलं. राज्यात अघोषित आणीबाणी होती. विरोधात बोललात तर घर फोडू, तुरुंगात टाकू, पोलीस ठाण्यात फिरवू, अशा प्रकारची आणीबाणी तयार झाली होती. अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचाराने परीसीमा गाठली होती. याविरोधात आपण संघर्ष करत होतो. मात्र आता महाराष्ट्रातील जनता खुला श्वास घेत आहे, असे म्हणत त्यांनी मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामे झाली नाहीत, असा आरोप केला.