शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आज (८ जुलै) गडचिरोली येथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपा, शिवसेने, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, आमचे नुतन साथी असलेले, पण जुने मित्र असलेले अजित पवार या सरकारमध्ये नुकतेच सहभागी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही दोघे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) गेल्या वर्षभरापासून काम करत होतो. आता अजित पवार आले आहेत. आम्ही एक त्रिशूळ तयार केलं आहे. हे विकासाचं त्रिशूळ आहे. हे त्रिशूळ राज्यतली गरिबी आणि मागासलेपण दूर करेल. हे त्रिशूळ शंकरासारखं आहे. जे भोळं आहे, परंतु जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील, त्यांच्यासाठी तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारं त्रिशूळ आहे. आमच्या तिघांच्या माध्यमातून तुम्हाला हे त्रिशूळ पहायला मिळेल.
फडणवीसांकडून राष्ट्रपतींच्या गडचिरोली दौऱ्याचा उल्लेख
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत आलो आहोत. तीन दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रपतीदेखील येथे आल्या होत्या. आपल्या भारताच्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे बघा. देशातल्या एका छोटाश्या गावातल्या, आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. आपल्या राष्ट्रपती आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे देशााला दिशा देण्याचं काम करत आहेत. याच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांपूर्वी गडचिरोलीत आल्या होत्या, हे आपलं सौभाग्य आहे.