बुधवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी प्रथेप्रमाणे राज्य सरकारकडून आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकून अधिवेशनात होणाऱ्या खडाजंगीचेच सूतोवाच दिले आहेत. यासंदर्भात माहिती देताना भाजपाच्या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विरोधकांकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना फडणवीसांनी इंदिरा गांधींच्या काळात देण्यात आलेल्या घोषणेची देखील आठवण करून दिली.

“आम्ही बोलू नये, अशी व्यवस्था केलीये”

अधिवेशनाच्या कालावधीवरून यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारच्या धोरणावर बोट ठेवलं. “अनेक विषय आहेत. पण दोन चर्चा फक्त मिळणार आहेत. पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी निर्बंध असतात. आम्ही बोलू नये, अशी व्यवस्था सरकारने केली आहे. पण तरी आम्ही बोलू. जेवढी आयुधं मिळतील, त्यांचा वापर आम्ही करू. एसटीचा संप, इतर ज्वलंत विषयांवर आम्ही बोलू. आमचा हा प्रयत्न असेल, की या अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

“आमचा भर चर्चेवर, गोंधळावर नव्हे”

अधिवेशनात भाजपाकडून चर्चेवर भर असल्याचं फडणवीस म्हणाले. “विरोधी पक्षांच्या वतीने आमचा भर चर्चेवर असेल, गोंधळावर नसेल. पण सरकारी पक्षाने जर योग्य प्रकारे वागायचंच नाही असं ठरवलं, सभागृहात आमचं ऐकून घेतलं नाही तर सभागृहाबाहेर जनतेच्या मैदानात आम्ही संघर्ष करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. ज्या प्रकारे लोकशाहीचा मुडदा ते पाडतायत तसं ते वागणार असतील, तर आम्ही संघर्षासाठी तयार आहोत”, असा इशारा फडणवीसांनी दिला.

“सरकारमध्ये लोकशाही नव्हे, तर रोकशाही आणि भोगशाही”, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी डागली तोफ!

सरकार नक्की कुणासाठी काम करतंय?

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा देखील उपस्थित केला. “पेट्रोल-डिझेलचे भाव केंद्रानं ५ आणि १० रुपये कमी केला. त्यानंतर २७ राज्यांनी आपला व्हॅट कमी करून दर कमी केले. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, ज्यांनी हे दर कमी केले नाहीत. विदेशी मद्यावरचा कर ५० टक्के कमी करण्याचं पाप या सरकारने केलं आहे. त्यामुळे हे सरकार नक्की कुणासाठी काम करतं? असा प्रश्न उपस्थित होतो”, असं फडणवीस म्हणाले.

हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाने कसली कंबर; राज्य सरकारला ‘या’ मुद्द्यांवर घेरण्याची तयारी!

“पेट्रोलचे भाव कमी करत नाही, पण दारूचे दर कमी करतं. त्यामुळे इंदिराजींच्या काळातलाच नारा पुन्हा द्यावा लागेल. ‘व्वा रे एमव्हीए तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल’ अशी अवस्था या सरकारने केली आहे”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देखील पेट्रोलच्या किंमती वाढल्यानंतर विरोधकांनी असाच नारा दिला होता. “वाह री इंदिरा तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”, अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. या घोषणा नंतर देखील अनेक सरकारांच्या काळात त्या त्या सरकारच्या नावाने दिल्या गेल्या.