विधानसभेत आज शिवसेना खासदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधवांनी माफी मागितली पाहिजे, अशी जोरकस मागणी केली. यावरून बराच गोंधळ झाल्यानंतर अखेर भास्कर जाधव यांनी माफी मागितली. मात्र, या मुद्द्यावरून दिवसभर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर देखील चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून भास्कर जाधव यांना खोचक सल्ला देताना त्यांच्यावर टीका देखील केली. तसेच, आम्ही सोबत काम केलं आहे, मी त्यांना सल्ला देतो, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भास्कर जाधवांचं वर्तन लज्जास्पद”

पंतप्रधानांची नक्कल करणं हे वर्तन लज्जास्पद असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. “सभागृहाचा दुरुपयोग करण्यात आला. भास्कर जाधव यांचं वर्तन आक्षेपार्ह आणि लज्जास्पद होतं. पंतप्रधान बोललेच नाहीत, ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान असं बोलल्याचा एकही व्हिडीओ कुणी देऊ शकलेलं नाही. पण ज्या प्रकारे अंगविक्षेप करून त्यांनी पंतप्रधानांची नक्कल केली, ते आक्षेपार्ह होतं. म्हणून आम्ही आग्रह केला की त्यांनी माफी मागितली पाहिजे. बराच वेळ त्यांनी आपलंच म्हणणं खरं असल्याचं मांडण्याचा प्रयत्न केला. माझी अपेक्षा आहे की कुणीही स्वत:ला सभागृहापेक्षा मोठं समजू नये”, असं फडणवीस म्हणाले.

“..ते अजूनही समर्थन करतायत हे वाईट”

“तुम्ही जर आमच्या नेत्यांचे अंगविक्षेप कराल आणि आम्ही तुमचं स्वागत करू असं भास्कर जाधवांना वाटत असेल तर ते होणार नाही. आश्चर्य म्हणजे अजूनही त्या गोष्टीचं समर्थन भास्कर जाधव करतायत हे त्याहीपेक्षा वाईट”, असं फडणवीस म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”, सत्ताधारी आमदारानंच दिला विधानसभेत नारा; अजित पवार लगेच म्हणाले…!

जणू त्यांनाच सगळं माहिती आहे…

“अलिकडच्या काळात भास्कर जाधवांचं वर्तन मी बघतोय. खाली बसून बोलायचं. प्रत्येक विषयात कोणताही विरोधी सदस्य बोलत असला, तर त्यावर टिप्पणी करायची. ते असतील हुशार. पण जणू सगळे नियम त्यांनाच माहिती आहे आणि आम्ही जे २०-२२ वर्षांपासून या सभागृहात आहोत, आम्हाला काहीच माहिती नाही अशा प्रकारे त्यांचं वर्तन आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“विधानसभेत नौटंकीपेक्षा हा पर्याय…”, भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्यानंतर भाजपाचा खोचक सल्ला!

ते माझे जुने मित्र, आम्ही सोबत काम केलंय…

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी भास्कर जाधव आपले जुने मित्र असल्याचं सांगितलं. “ते माझे जुने मित्र आहेत, आम्ही सोबत काम केलंय. मी त्यांना सल्ला देतो. मी चिडचिड करत असेन, तर मी नक्की कमी करेन. पण मी चिडचिड करत नाही. पण ते ज्या पद्धतीने वागतायत, ते त्यांनी सुधरवलं पाहिजे. असं वागणं योग्य नाही. हे बरं नव्हं”, असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mocks bhaskar jadhav on narendra modi mimicry in mah assembly pmw