“तुम्ही देशातली सत्ताही घेतली, महाराष्ट्रातलीही तुम्हाला हवी, ग्रामपंचायत, सोसायट्याही तुम्हाला हव्यात, मग आम्ही धुणीभांडी करायची का?” असा सवाल काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला होता. या मुद्द्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
“ज्यांनी दाऊदला सहकार्य केलं…”
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नवाब मलिक प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रच नव्हे, देशाच्या इतिहासात जे घडलं नाही, ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. बॉम्बस्फोटाचे आरोपी, दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत थेट व्यवहार करून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आख्खं राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभं राहिलं आहे. दाऊद इब्राहिमला सहकार्य केलं, मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी व्यवहार केला, त्यांना वाचवायला आख्खं सरकार उभं राहिलं आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतर देखील मंत्रीपदावर ती व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे हा राज्यघटनेचा अवमान सरकार करतंय”, असं फडणवीस म्हणाले.
“मला आश्चर्य वाटतं, ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांच्या पाठिशी उभं आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे”, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.
“तुम्हाला सगळंच पाहिजे, मग आम्ही धुणी-भांडी करायची का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल!
मुख्यमंत्री म्हणाले होते, “..मग आम्ही धुणीभांडी करायीच का?”
‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना भाजपाला टोला लगावला होता. “युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, ग्रामपंचात, स्थानिक निवडणुका सगळंच तुम्हाला पाहिजे. मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
“माझं आव्हान आहे…”
यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचंय. पण त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करतायत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय, ती बंद झाली पाहिजे. माझं आव्हान आहे की जशी माझी पत्रकार परिषद चालते, तशी त्यांचीही घ्या. त्यांच्याकडूनही उत्तरं येऊ देत”, असं फडणवीस म्हणाले.