Maharashtra Budget Session 2022 : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर यथेच्छ आगपाखड केल्यानंतर आज अधिवेशनाचा पहिला दिवस देखील तेवढाच वादळी ठरला. आधी राज्यपालांना सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे अभिभाषण आटोपतं घ्यावं लागलं आणि नंतर विरोधकांनी सभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी नारेबाजी केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बुधवारी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ परिसरातून बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं झालं काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षांच्या बैठकीसमोर बोलताना भाजपावर परखड टीका केली. “३० वर्ष सापाच्या पिलाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारतंय”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावलं. तसेच, “तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
“सापाच्या पिलाला ३० वर्ष दूध पाजलं, आता ते…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर
“बाळासाहेबांचंही हेच मत होतं का हे त्यांनी सांगावं”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “मला वाटतंय की मुख्यमंत्री अत्यंत निराश आणि हताश आहेत. ज्या प्रकारे त्यांच्या सरकारमधला मंत्री दाऊदसोबत दिसतोय, दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार करताना दिसतोय. यावर काय बोलावं, हे मुख्यमंत्र्यांना समजलं नसल्यामुळे मुख्यमंत्री असं बोलत आहेत. भाजपा-शिवसेनेचा सवाल असेल, तर असं आहे की ही युती त्यांनी केलेली नाही. ही युती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचंही असंच मत होतं का? हे त्यांनी सांगावं”, असं फडणवीस म्हणाले.
नवाब मलिकांच्या अटकेवर फडणवीस म्हणतात…
दरम्यान, सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणावर देखील सविस्तर भूमिका मांडली. “हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे सरकार त्या मंत्र्याच्या पाठिशी उभं राहात असेल, तर हे दाऊद शरण सरकार आहे असंच म्हणावं लागेल. संजय राठोड जेलमध्ये गेले नसतानाही तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. इथे तर नवाब मलिक जेलमध्ये असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरी त्यांना वाचवण्याचं कारण काय? कुणाच्या दबावाखाली नवाब मलिकांना वाचवलं जात आहे, हे प्रश्न आम्ही विचारणार आहोत. सरकार पळ काढतंय. पण कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.