राज्यात एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा चालू असताना दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. बेळगावसह सीमाभागावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणुकांवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यासंदर्भात आज बेळगावमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली.
“माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी मी…”
“लोकसभेच्या निवडणुकीवेळीही मी इथे आलो होतो. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे इनचार्ज होते. संपूर्ण कर्नाटकमध्ये सगळीकडे ते फिरत होते. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी इथे आलोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. “मराठी भाषिकांच्या मागे मीही आहे आणि भाजपाही आहे”, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.
“संजय राऊत काँग्रेसची दलाली करतायत”
दरम्यान, संजय राऊत काँग्रेसची दलाली करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली. “संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली, तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी इथे येतायत. आम्हाला सांगण्यापेक्षा संजय राऊतांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही इथे उमेदवार उभे करू नका, त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका. कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत इथे आले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संजय राऊतांचं आव्हान
संजय राऊतांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं होतं. “जर तुम्ही खरंच बेळगावातल्या मराठी भाषिकांच्या पाठिशी असाल, तर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी यावं”, असं संजय राऊत म्हणाले होते.