राज्यात आणि देशातही सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. “संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत त्यांना अटक केली,” असा आरोपही शरद पवारांनी केला होता. यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य आणि देशपातळीवर सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर टीकास्र सोडण्यात येत आहे. त्यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टोला लगावला आहे.
अमित शाह यांच्या दौऱ्यावर स्पष्टीकरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या पाच सप्टेंबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह राज ठाकरेंचीही भेट घेणार असून त्यामध्ये भाजपा-मनसे युतीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अमित शाह गणेश दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचं सांगितलं.
“दरवर्षी गणेशोत्सवात अमित शाह मुंबईत येतात. काही गणपतींचं ते दर्शन घेतात. लालबागचा राजा, आशिष शेलार यांच्या गणपतींचं दर्शन घ्यायला ते जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतील. आमचे वरिष्ठ नेते येतायत तर त्यांच्यासोबत एक बैठक व्हावी अशी आम्ही विनंती केली होती. त्यासाठीही त्यांनी वेळ दिला आहे. एका शाळेचंही ते उद्घाटन करणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे. मुंबईशी त्यांचं वेगळं नातं आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
संजय राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया देत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करताच फडणवीसांनी मोदींचं नाव घेत त्यावर उत्तर दिलं. “आजकाल ही फॅशन झालीये की तुम्ही जेव्हा कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा अशी टीका करायची. मोदींच्या कामाचा आवाका एवढा मोठा झालाय आणि ज्या प्रकारची कामं त्यांनी केली आहेत, की त्याचं कोणतंही उत्तर हे विरोधक देऊ शकत नाही”, असं फडणवीस म्हणाले.
“मी विरोधकांना एवढाच सल्ला देईन की मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा”, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.