राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवरही खोचक शब्दांत टीका करताना ‘पाय जमिनीवर ठेवण्याचा’ सल्ला दिला. शरद पवारांच्या या विधानाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवनीसांनी सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार गंभीर असल्याचंही सांगितलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. “सरकार खूप गंभीर आहे. आम्ही हरीश साळवेंशी संपर्क साधला असून ते आपली केस मांडतील अशी मला आशा आहे. त्यामुळे आपली केस मजबूत आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“सामना हा काही पेपर नाही”
दरम्यान, सामनामधील संजय राऊतांच्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यावर उत्तर देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. “सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही”, असं ते म्हणाले.
शरद पवारांच्या विधानावर पलटवार!
दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरून टोला लगावला. “सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण अलिकडे मी बघतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात. ‘यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन’.. ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत. पण इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली. ठीक आहे”, असं शरद पवार म्हणाले. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे”, असा सल्ला फडणवीसांनी शरद पवारांना दिला आहे.