महाराष्ट्राच्या राजकीय खेळपट्टीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग या मुद्द्यांवरून तुफान सामना रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले असताना आज क्रिकेटच्या भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

लूज बॉल सीमारेषापार!

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक टिप्पणी देखील केली. “सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. आणि बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळेच….,” संजय राऊतांचा टोला

रश्मी शुक्ला प्रकरणावर सरकारला सवाल!

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीस यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरून राज्य सरकारला सवाल केला आहे. “माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठिशी घालतंय हे स्पष्ट दिसतंय. जे संभाषण झालंय, जे व्यवहार झालेत, जे रॅकेट झालंय, त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारची नाही”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली. “एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे पाहिलं पाहिजे. पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणंच मूर्खपणाचं आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले.

संजय राऊतांनाही टोला!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या “शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं” या मागणीवर देखील फडणवीसांची खोचक टोमणा मारला. “युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो”, असं ते म्हणाले.

Story img Loader