महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने अर्थ लावून त्यावर दावे करताना दिसत आहेत. शिंदे गट आणि भाजपाकडून निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचा दावा केला जात असताना ठाकरे गट आणि मविआकडून हा निकाल शिंदेंच्या विरोधात कसा आहे, याचे दाखले दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये नव्याने कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई भेटीनिमित्ताने बुधवारी संध्याकाळी उशीरा आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी तुफान टोलेबाजी केली.
“सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केलंय की…”
भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली. “राज्यात आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्याने बेकायदा सरकार, चुकीचं सरकार अशी टीका केली जात होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊन सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वतलंच सरकार कायदेशीर आहे आणि त्यांना सरकार स्थापन करायला सांगणं किती योग्य होतं हे निकालात आलं”, असं फडणवीस म्हणाले.
“…अशी या निर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झालीये”
“काहींचं काय चाललंय… ते सांगतात आम्हीच जिंकलो. म्हटलं तुम्ही जिंकले तर बडवा. पण आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाहीयेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. एका राजाला एक पोपट फार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न असा आहे की राजाला सांगेल कोण की पोपट मेला आहे. कारण जो सांगेल त्याचा शिरच्छेद होणार. राजा विचारतो, कसा आहे आमचा पोपट? तो म्हणतो पोपट चांगला आहे. पण काही खात नाही, पीत नाही. बोलत नाही. मान हलवत नाही. पाय हलवत नाही. अशीच यानिर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झाली आहे”, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा उल्लेख ‘शिवसेना’ असा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
“एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
“त्यांना माहितीये पोपट मेलाय, पण…”
“त्यांना माहिती आहे की पोपट मेलाय. पण तरी सांगतायत की १६ आमदार अपात्र ठरणार, २० अपात्र ठरणार, २२ अपात्र ठरणार. पण ठीक आहे. अध्यक्षांना ते अधिकार दिले आहेत. मी कधी कायद्याच्या पलीकडे जात नाही. पण मला असं वाटतंय की कुणीतरी उद्धवजींना सांगितलं पाहिजे की उद्धवजी आता पोपट मेलाय. आता हे सरकार टिकणारही आहे, काम करणारही आहे आणि हेच सरकार पुन्हा निवडूनही येणार आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
“अडीच वर्षं मोदींचा विकास तुम्ही थांबवून ठेवला. अडीच वर्षांत देशभरात मेट्रोची कामं होत होती. आमची मेट्रोची कामं बंद होती. रस्त्याची कामं बंद होत होती. विकास बंद होता. सगळ्या गोष्टींना स्थगिती होती. एकच कारण होतं की ही सगळी कामं पूर्ण झाली, तर भाजपाला त्याचं श्रेय मिळेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पंतप्रधान आवास योजनेत गरीबाला द्यायचे पैसे अडवण्याचं काम केलं गेलं”, असंही ते म्हणाले.