धुलिवंदनाच्या निमित्ताने जनसामान्यांप्रमाणेच राजकीय नेतेमंडळीही आज धुळवडीचा आनंद घेताना दिसत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये धुलिवंदन साजरं केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर इतर रंगांप्रमाणेच काही ठिकाणी राजकीय रंगदेखील उधळले गेल्याचं दिसून आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाजपा कार्यालयात धुलिवंदन साजरं केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना राजकीय फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
“अर्थसंकल्पात प्रत्येकाचे रंग दिसतील”
यावेळी देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्पाविषयी विचारणा केली असता तो सर्वच घटकांचा असेल, असं ते म्हणाले. “ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“जर मर्द असाल तर…” संजय राऊतांचं शिंदे गटाला थेट आव्हान; ठाण्यातील प्रकारावर घेतलं तोंडसुख!
“आम्ही म्हणालो होतो की बदला घेऊ, आता…”
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राजकीय विरोधकांचा बदला घेण्यासंदर्भातील आपल्या विधानाचा संदर्भ देऊन विरोधकांना लक्ष्य केलं आहे. “आम्ही विधानसभेत सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिलाय. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही”, असं फडणवीस म्हणाले.
“अनेक वेळा होळीला आमच्या काही मित्रांना खोटं सांगून. भांग वगैरे पाजून दिली. त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं, कुणी गाणं म्हणत होतं. कुणी रडत होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा”, अशा शब्दांत फडणवीसांनी टोलेबाजी केली. यावेळी त्यांचा रोख विरोधकांच्या दिशेने असल्याचं सांगितलं जात आहे.
“मला एक-दोन लोकांना सल्ला द्यायचाय की…”
“मला एक-दोन लोकांनाच सल्ला द्यायचाय की उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा करण्याची पद्धत आहे. पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. मला त्यांना सांगायचंय की एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.