Devendra Fadnavis Mother Video Reaction on Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आज (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर केले जात आहेत. यादरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांचा समावेश असणार्या महायुतीला राज्यात मोठा विजय मिळताना दिसत आहे. राज्यात भाजपा सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. यादरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयामागचा प्रमुख चेहरा असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना सरिता फडणवीस म्हणाल्या की, “आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. कारण एका आईसाठी तिचा मुलगा महाराष्ट्राचा खूप मोठा नेता बनला, याचा आनंद तर होणारच. २४ x ७ त्यांची मेहनत सुरू होती. जेवण, झोप कशाकडेच लक्ष नव्हतं. फक्त प्रचार, प्रचार आणि प्रचार सुरू होता”.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार का? असे विचारले असता, “हो, यामध्ये काही शंका नाही, मुख्यमंत्री तर शंभर टक्के बनतीलच. लाडक्या बहिणींचा आशीर्वादही त्यांना मिळाला, पण लाडकी बहीण योजना नसती तरीदेखली देवेंद्र फडणवीस जिंकणारच होते”, असेही सरिता फडणवीस म्हणाल्या.
भाजपाला विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. यादरम्यान राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा देवेंद्र फडणवीस गळ्यात पडण्याची शक्यता आहे. महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल भाजपाचे नेते प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल भाष्य केलं होतं.
दरेकर काय म्हणाले?
विधानसभा निवडणूक निकालांबद्दल बोलताना दरेकर म्हणाले की, “लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”
हेही वाचा>> Sunetra Pawar : “सगळा आकड्यांचा खेळ…”, अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये भाजपा १२७ शिंदे सेना ५६ आणि अजित पवाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४० जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या ४७ जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस २०, शिवसेना (ठाकरे) १० आणि शरद पवारांची राष्ट्रवादीचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत. तर १८ जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत.