अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का? असे विचारले जात होते. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते कोठेही जाणार नाहीत,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात फडणवीस भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री असतील, असे मोठे विधानही बावनकुळे यांनी केले. ते अकोल्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. पुढेही करत राहतील. ते दिल्लीला जाणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्या काल्पनिक आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. आगामी काळात ते भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री होतील. आमच्यासारखा कोणताही कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करू शकत नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीसच पुढे नेऊ शकतात. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ब्राह्मण महासंघाने काय मागणी केली होती?

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे पी नड्डा यांना एक पत्र लिहिले होते.“पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे. जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असे या पत्रात म्हणण्यात आले होते.

“अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे,” अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती.

दरम्यान अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्ववान नेते आहेत. कर्तृत्वाच्या आधारावरच त्यांचा विचार केला जाणार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. “या देशामध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा तसेच मागणी करण्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस हे जात, धर्माच्या वर आलेले आहेत. ते एक कर्तृत्ववान नेते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार हा त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारेच झालेला आहे. त्यामुळे मागणी कोणीही करू शकतं,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis next cm of shivsena bjp alliance government said chandrashekhar bawankule prd