Devendra Fadnavis Oath: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांची मोठी पीछेहाट झाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित झालं. पण निकाल लागल्यानंतर जवळपास १० दिवस मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेच्या फेऱ्या पाहायला मिळाल्या. अखेर देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसणार असल्याचं निश्चित झालं. मुख्यमंत्री म्हणून ही देवेंद्र फडणवीस यांची तिसरी टर्म असेल. यानिमित्ताने एकीकडे विरोधकांकडून सावध शब्दांत फडणवीसांना शुभेच्छा दिल्या जात असताना देवेंद्र फडणवीसांच्या बालपणीच्या मित्रांनी त्यांच्या काही आठवणी जागवल्या आहेत.
लहानपणी कसे होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील तीन बालपणीच्या मित्रांनी एबीपी माझाशी बोलताना या आठवणी जागवल्या आहेत. यात त्यांच्या हर्षल नावाच्या मित्राने त्यांच्या बालपणाबाबत सांगितलं आहे. “देवेंद्र काहीतरी वेगळं करेल हे आधीपासूनच जाणवत होतं. विवेकानंदांवर भाषण असेल, सावरकरांवर भाषण असेल तर तो लगेच उभा राहून भाषण सुरू करायचा. खेळात वगैरे नेतृत्व दिसतच होतं”, असं ते म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची क्रिकेट मॅचसंदर्भातली एक आठवण त्यांचे मित्र संजय यांनी सांगितली आहे. “आमची देवेंद्रसोबत त्रिकोणी पार्कला नियमित भेट व्हायची. ती अशी जागा आहे जिथे लहानपणी धरमपेठ परिसरातले सगळे मुलं खेळायचे. क्रिकेटची मॅच असेल तेव्हा देवेंद्र बॅटिंग करायचा आणि बॉलिंग व फिल्डिंगची वेळ आली की काहीतरी कारण सांगून निघून जायचा. त्याचा स्वभाव खोडकर होता”, असा किस्सा त्यांनी सांगितला.
“कुणी कितीही टिंगल केली, तरी देवेंद्र हसण्यावारी न्यायचा”
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असाच त्याच्याबद्दल आमचा दृष्टीकोन होता. देवेंद्रमध्ये अनेक वेगळे गुण होते. प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक निर्णय घेणारा आत्मविश्वास असणारा घडला होता. एकतर गंगाधरराव यांचा सुपुत्र होता. घरात जनसंघाचं वातावरण होतं, असंख्य लोकांचा घरात राबता होता. त्यामुळे त्याच्यावर नकळतच संस्कार झाले. हे सगळं करताना कुणी त्याची कितीही टिंगल करो, हसण्यावारी न्यायचा. कधी प्रत्युत्तर करायचा नाही. त्याचा स्वभाव समोर जाऊन सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा स्वभाव होता”, असंही संजय म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांसोबत भेट कशी ठरते?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस महत्त्वाच्या पदावर असल्यामुळे ते नागपूरला आल्यावर मित्रांशी भेट कशी ठरते? याविषयी हर्षल यांनी सांगितलं आहे. “भेट कशी ठरते हे सिक्रेट आहे. पण भेटी होतात. जेव्हा भेट व्हायची तेव्हा प्रत्येकाला आपापले मेसेज मिळतो. थोड्या वेळासाठीही भेट होते. रात्री केव्हातरी बोलवणं येतं. कुठेतरी एकत्र जायचं. गप्पा मारायचं बस्स. आम्हाला खाण्यात वगैरे काही रस नाही. सगळ्या जुन्या गोष्टींवर गप्पा होतात. पुस्तक लिहीता येईल एवढ्या गोष्टी आहेत”, असं ते म्हणाले.