अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय झाल्याचं नुकतंच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा चालू असतानाच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो अहमदनगरमधला असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक युवक नाचताना पाहायला मिळत आहे. ही मिरवणूक नेमकी कशाची आहे? याचा व्हिडीओमध्ये खुलासा होत नसून हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे? याविषयीही खात्रीशीर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असाता त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही”, असं फडणवीस म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? फडणवीस म्हणतात…
दरम्यान, यावेळी राज्यात रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलं. “मंत्रीमंडळ विस्तार होणारच आहे. तो केव्हा होणार, हे मुख्यमंत्री ठरवतील आणि सांगतील”, असं ते म्हणाले. “अमित शाहांबरोबर झालेल्या बैठकीत सर्व निवडणुका एकत्र लढायच्या, दोन्ही पक्षांमध्ये तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवायचा, अशी चर्चा झाली”, अशीही माहिती त्यांनी दिली.