राज्यातील काही शहरांमध्ये औरंगजेबाच्या स्टेटसवरून दंगली घडल्या होत्या. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. “राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पण, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार असेल, तर त्याला सोडणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यातील दंगलींची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण, राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. कारण, औरंगजेबाचे पोस्टर, मिरवणुकी, स्टेटस अचानक अनेक जिल्ह्यांत समोर आले. हा योगायोग नाही, तर हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता. तो कधी होणार सुद्धा नाही. औरंगजेब हा आक्रंत होता.”
“या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. ए.पी.जे अब्दुल कलाम देशाचे हिरो होऊ शकतात. पण, औरंगजेब होऊ शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. मग, औरंगजेब आमचा हिरो होऊच शकत नाही. औरंगजेब हा टर्कीक मंगोल वंशाचा होता. टर्कीक मंगोल वंशाचे भारतात आणि पाकिस्तानात काही लाख लोक आहेत. त्यामुळे येथील लोक औरंगजेबाचे वंशज देखील नाहीत,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
“पण, याच्या पाठीमागे कोण आहे, हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे. काहींना अटकही केली आहे. कोणत्याही परिस्थितीत धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव करणार नाही. मात्र, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार असेल, तर सोडणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.