Devendra Fadnavis : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच या घटनेची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील या घटनेबाबत विधानसभेत आवाज उठवला.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं, अशी मागणी केली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत त्यांनाही तातडीने अटक करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवरून सरकारवर टीका केली. या संपूर्ण प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसेच यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : “भुजबळ फडणवीसांना भेटतात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत, याचा अर्थ…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुम्ही (देवेंद्र फडणवीस यांनी) घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया काय? असं देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले की, “बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. मग बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंच्या टिकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर
बीड आणि परभणीच्या घटनेवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “बीड आणि परभणीची घटना कोणत्याही राज्याला शोभणारी नाही. अस्वस्थ करणाऱ्या या घटना आहेत. या दोन्ही घटनेत न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? याबाबत माझ्या मनात भिती वाटते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. या टिकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यपेक्षा सुरक्षित राज्य आहे. पण प्रत्येक घटनेचं एवढं राजकारण करणं हे विरोधकांना शोभत नाही.”