राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या राज्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना दिसत आहे. त्यातच दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेली २४ डिसेंबरची मुदत जवळ येत असल्यामुळे त्यानंतर नेमकं काय होणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मराठा गेल्या महिन्यात मराठा आरक्षणाची मागणी करत काही जमावांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरी जाळपोळ केल्याचे प्रकार घडले होते. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जमावाने जाळलं. बीड व माजलगावमध्ये राजकीय नेत्यांच्या घरांवर व कार्यालयांवर असे हल्ले झाल्यानंतर त्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करत संदीप क्षीरसागर यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“खरंतर ही घटना अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारे जमावाने लोकप्रतिनिधींची घरं जाळणं, त्यांना लक्ष्य करणं हे गंभीर आहे. सर्वच पक्षाच्या लोकांना या जमावाने लक्ष्य केलं. सगळ्यांवरच हल्ला झाला. संदीप क्षीरसागर यांनी मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. माझं असं स्पष्ट मत आहे की अशा घटनांकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. अशा घटनांमध्ये आपण राजकारण करायला लागलो, तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कधीही राहणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“ठाकरे गटातील नेत्याची बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर पार्टी”, भाजपाकडून फोटो जाहीर, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

“आधी घटना घडली तेव्हा पोलीस बळानं लगेच कारवाई केली. जर ती केली नसती, तर घटना याहीपेक्षा गंभीर झाली होती. पण जेवढे लोक एकत्र झाले होते, त्याप्रमाणात पोलिसांची ताकद कमी होती. बाहेरून पाठवलेले पोलीस पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या होत्या”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी विधानसभेत दिली.

२७८ आरोपींना अटक

या सर्व प्रकरणात आत्तापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला दिली. “एकच जमाव सगळीकडे गेला असं नाहीये. वेगवेगळे जमाव तयार झाले होते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. माजलगाव व बीडमध्ये आपण २७८ आरोपींना अटक केली आहे. त्यातले ३० आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्यांची नोंद आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“माजलगावच्या प्रकरणात अजूनही ४० गुन्हेगार फरार आहेत. बीडमधील वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील ६१ गुन्हेगार अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध चालू आहे. जमावातल्या सर्वच लोकांना पकडलेलं नसून ज्यांच्याविरूद्ध सबळ पुरावा आहे, जे लोक हे सगळं करताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. मोबाईल लोकेशन, मोबाईलमधले मेसेजेस, अशा सर्वच मार्गांनी ज्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले आहेत, अशांना अटक केली आहे”, असंही फडणवीसांनी सांगितलं.

मोठी बातमी: शिवसेना अपात्र आमदार सुनावणीसाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

“पोलीस कारवाई अधिक कठोर व्हायला हवी होती”

दरम्यान, बीड व माजलगावमध्ये अधिक कठोर पोलीस कारवाई व्हायला हवी होती, असं फडणवीसांनी विधानसभेत मान्य केलं आहे. “पोलिसांची कारवाई याहीपेक्षा जास्त व्हायला हवी होती. पण दंगलखोर जमाव व पोलिसांची संख्या यात मोठी तफावत होती. पोलिसांची नवी कुमक पोहोचेपर्यंत या घटना नियंत्रणात आणणं कठीण झालं हेही सत्य आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“…तर एकाही लोकप्रतिनिधीचं घर शिल्लक राहणार नाही”

दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये आरोपी म्हणून काही अशा लोकांना अटक करण्यात आली आहे ज्यांचा गुन्हेगारी जगताशी काहीही संबंध नाही, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. ही मागणी फडणवीसांनी फेटाळून लावली. “ज्यांनी चूक केली नसेल, त्यांना अटकेतून बाहेर काढेन हा शब्द मी देतो. पण ज्यांनी चूक केली आहे, त्यांना अजिबात माफी देण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारे जर आपण त्यांना आत्ता माफी द्यायला लागलो, तर भविष्यात महाराष्ट्रात एकाही लोकप्रतिनिधीचं घर शिल्लक राहणार नाही”, अशा शब्दांत फडणवीसांनी क्षीरसागर यांना उत्तर दिलं.